प्रेम आणि मराठी कविता! - Wide Wings Media

Blog

प्रेम आणि मराठी कविता!

सध्या चहुबाजूने प्रेमाचा वर्षाव आपल्याला Valentine’s Week मध्ये बघायला मिळतोय!
प्रेम म्हटलं की आठवतात त्या कविता, शायरी, गज़ल वगैरे वगैरे. प्रेमाला भाषा नसते असं म्हणतात पण प्रत्येक भाषेत ‘प्रेम’ तितक्याच वेगवेगळ्या रीतीने व्यक्त होतं हेही तितकच खरं! मराठी साहित्यात कवी मंडळींनी ‘प्रेम’ या विषयावर अनेक कविता केल्या, पण त्या करत असताना ते कसं करावं आणि कोणावर करावं हे ही तितक्याच सुंदरतेने वर्णिले आहे!
मला पहिली आठवते ती कुसुमाग्रजांची ‘प्रेम कर भिल्लासारखं’ ही कविता! प्रेमाबद्दल गुलाबी चित्र रंगवण्याआधी प्रेम कसं करावं आणि प्रेम ही किती मोठी गोष्ट आहे हे कुसुमाग्रज या कवितेत सांगतात. प्रेम म्हणजे काय हे सांगताना कुसुमाग्रज लिहतात :

‘प्रेम म्हणजे वणवा होऊन जळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं’

आज कालच्या ‘I Think it’s not working anymore’ च्या युगात या दोन ओळी किती काही सांगून जातात!

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं

खरं प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी बहुदा एवढाच सल्ला पुरेसा!

तसं इतर वेळी आपण प्रेम या भावनेला फक्त एक स्त्री आणि एक पुरुष या कोशात अडकवून ठेवतो पण खरं पाहता प्रेम ही तशी फार व्यापक भावना आहे. तेच सांगणारी कुसुमाग्रजांचीच आणखीन एक कविता ‘प्रेमयोग’
प्रेम कुणावर करावं? या प्रश्नाला उत्तर देत कुसुमाग्रज लिहतात :

‘प्रेम कुणावरही करावं,
प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं,
अर्जुन नावाच्या राजेन्द्रावर करावं,
बासरीतून पाझरणाऱ्या सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं,
यमुनेचा डोह जहरुन टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं’

श्री कृष्णाच्या आयुष्यात आलेल्या काही प्रिय लोकांचा उल्लेख करून कृष्णालाच मारण्यासाठी आलेल्या कालिया नागावरही प्रेमच करावं, असं कुसुमाग्रज म्हणतात. आयुष्यात जितके महत्वाचे मित्र तितकेच महत्वाचे शत्रू ही, त्यामुळे त्यांच्यावरही प्रेमच करावं!

‘ज्याला तारायचं,
त्याच्यावर तर करावंच,
पण ज्याला मारायचं,
त्याच्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं’

माणसाच्या आयुष्यात प्रेम इतकं महत्वाचं का आहे, हे सांगताना कुसुमाग्रज म्हणतात :

‘प्रेम कुणावरही करावं
कारण प्रेम आहे
माणसाच्या संस्कॄतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
आणि
भविष्यकालातील
त्याच्या अभ्युदयाची आशा
एकमेव ….. !’

प्रेमावर अनेक कवींनी फार सुंदर दृष्टिकोन आपल्या काव्यातून दिला आहे मग ते ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं!’ असं सांगणारे मंगेश पाडगावकर असोत किंवा ‘दिनरात चिंतनाचे अनिवार कौतुकाचे विश्वाहुनी निराळे हे विश्व प्रेमिकांचे!’ म्हणणाऱ्या शांताबाई शेळके.
प्रेम करायला मराठीने असं शिकवलं असं म्हणायला हरकत नाही!

– मयुरेश टांकसाळे
Wide Wings Media

Write a comment