World Theatre Day! - Wide Wings Media

Blog

World Theatre Day!

जागतिक रंगभूमी दिन!

माणसाच्या भावभावनांच्या खेळाचा प्रत्यक्ष दृश्य अविष्कार आपल्याला पाहायला मिळतो तो रंगभूमीवर सादर होणाऱ्या नाटकातून. प्रेक्षकांच्या टाळ्यांमधून, हास्यातून आणि कधी कधी अश्रुंमधून मिळणाऱ्या जिवंत प्रतिसादाची अनुभूती ऍक्टरला मिळू शकते ती फक्त नाटकातूनच. १९६१ साली ‘International Theatre Institute’ या संस्थेने सर्वप्रथम २७ मार्च हा दिवस ‘World Theatre Day’ म्हणून घोषित केला आणि तेव्हापासून हा दिवस रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या कलाकारांकडून, संस्थांकडून आणि अर्थातच नाट्यरसिकांकडून ‘जागतिक रंगभूमी दिन‘ म्हणजेच ‘World Theatre Day’ म्हणून साजरा केला जातो.

पाश्चिमात्य नाटकांचे मूळ ग्रीक आणि रोमन नाटकांमध्ये दिसून येते, शेक्सपिअरची नाटके तर जगप्रसिद्ध आहेतच. पण त्याचबरोबर ख्रिस्तोफर मार्लोव, थॉमस मिडलट्न आणि बेंजामिन जॉन्सन या त्याच्याच समकालीन नाटककारांची नाटकेही विख्यात आहेत. भारतात नाटकाची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. साधारणपणे इ. स. पूर्व ५०० व्या शतकात भरत मुनींनी ‘नाट्यशास्त्र’ हा ग्रंथ लिहिला होता. आजही अभिनयाचे शिक्षण देणाऱ्या अनेक संस्थांमध्ये ह्या ग्रंथाचा महत्वाचा संदर्भग्रंथ म्हणून अभ्यास केला जातो. संस्कृत नाटकांमध्ये बौद्ध धर्मातील शिकवणींवर आधारित अश्वघोष या नाटककाराची नाटके सर्वात प्राचीन मानण्यात येतात. कालिदासाचे ‘मेघदूत’ हे काव्य तर सर्वश्रुत आहेच पण कालिदासानेच लिहिलेली ‘मालविकाग्निमित्र’, ‘विक्रमोर्वशीय’ आणि ‘अभिज्ञान शाकुंतल’ ही नाटकेसुद्धा प्रसिद्ध आहेत. याव्यतिरिक्त भासाचे ‘स्वप्नवासवदत्त’, शूद्रकाने रचलेले ‘मृच्छकटिक’, भवभूतीचे ‘उत्तररामचरित’ आणि विशाखदत्ताचे ‘मुद्राराक्षस’ ही नाटकेही लोकप्रिय आहेत. १८४३ मध्ये विष्णुदास भावेंनी ‘सीता स्वयंवर’ ह्या पहिल्या मराठी नाटकाचा प्रयोग केला आणि मराठी नाटकाची मुहूर्तमेढ रोवली. बळवंत पांडुरंग किर्लोस्करांनी (१८४३-१८८५) कविकुलगुरू कालिदासाच्या अजरामर शाकुंतलाचे मराठी रूपांतर १८८० साली केले.

मराठी नाटकांना संगीत नाटकांची परंपरा आहे. विष्णुदास भावे हे आद्य संगीत नाटककार होते. ‘संगीत मानपमान’, ‘संशयकल्लोळ’, शारदा आणि बालगंधर्वांच्या अभिनयाने समृद्ध झालेले ‘एकच प्याला’ आदी नाटके प्रचंड गाजली. त्यातील पदे आजही अनेकदा नव्या गायकांकडून गायली जातात. संगीत नाटकांकडून आधुनिक गद्य नाटकांकडे वाटचाल सुरु झाली आणि ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ सारखी ऐतिहासिक नाटके असोत किंवा ‘वाडा चिरेबंदी’, ‘सखाराम बाइंडर’ सारखी सामाजिक नाटके असोत, या सर्व नाटकांनी मराठी रंगभूमीला अधिक समृद्ध बनवले. याच बरोबर प्रायोगिक रंगभूमीसुद्धा उदयाला येत होती. आजही या प्रायोगिक रंगभूमीतूनच अनेक तरुण कलाकार नाट्यसृष्टीत पदार्पण करत आहेत. मराठी प्रमाणेच हिंदी, बंगाली आणि गुजराथी रंगभूमीनेसुद्धा नाट्यक्षेत्रात बहुमोल योगदान दिले आहे.

प्रेक्षक नाटक पाहण्यासाठी आजही उत्सुक आहेत. पण अशा नाट्यरसिक प्रेक्षकांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहायला जाणारा प्रेक्षक डॉल्बी सिस्टीमसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाने समृद्ध अशा एसी थिएटरमध्ये बसून चित्रपट पाहण्याची मजा घेत असतो. मग अशा प्रेक्षकांना नाटक बघतानाही तशाच सुविधा मिळतील आणि ते नाटकाचा आनंद घेऊ शकतील अशी व्यवस्था नाट्यगृहामध्ये असायला हवी. उत्तम ध्वनीव्यवस्थेसह अशा सुविधा असलेली नाट्यगृह निर्माण व्हायला हवीत. या जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने आपण त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत.

खरं तर आजच्या या इंस्टाग्रामच्या युगात प्रेक्षकांसमोर मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध आहेत. तरीही नाटक आजही आपलं स्थान टिकवून आहे. कारण चित्रपटात किंवा इतर दृश्य माध्यमात एकदा सर्व शॉट ओके होऊन शूटिंग संपलं की कलाकाराने त्या क्षणी केलेला अभिनय कायमस्वरूपी होऊन जातो. मग त्यानंतर कितीही इच्छा असली तरी कलाकाराला एकदा केलेल्या अभिनयात बदल करता येत नाही, पण नाटकाच्या प्रत्येक प्रयोगात अभिनेत्याला काहीतरी वेगळं आणि मागच्या प्रयोगापेक्षा चांगलं करून दाखवण्याची संधी असते. तसेच प्रेक्षकांनासुद्धा अभिनेत्याला प्रत्यक्ष पाहण्याची आणि कलाकाराला प्रत्यक्ष समोरून टाळ्यांनी जिवंत दाद देण्याची संधी फक्त नाटकातूनच मिळू शकते आणि म्हणूनच चित्रपट, ओटीटी आणि टीव्हीच्या या युगात नाटकाचं अस्तित्व आणि महत्व आजही टिकून आहे.

– अनघा घाणेकर-गपचूप
  Wide Wings Media

Write a comment