back

पुण्याचं नाट्यशिखर: नाट्यसत्ताक रजनी २०२४

Table of Contents

पुण्यात थंडीची पहाट. २५ जानेवारीची रात्र, सर्वत्र एक निराळंच चैतन्य! दिव्यांच्या प्रकाशात न्हालेलं ‘झपूर्झा – म्युझियम ऑफ आर्ट ॲण्ड कल्चर’. मनात उत्सुकता आणि अंगावर शहारे उभी करणारी थंडी. ‘नाट्यसत्ताक रजनी २०२४’ – एक कला महोत्सव ज्याने पुणेकरांच्या हृदयात एक खास जागा निर्माण केली आहे. आठ वर्षांचा हा प्रवास, खरोखरच थक्क करणारा!


या महोत्सवाचे आयोजन ‘वाइड विंग्ज मीडिया’ या संस्थेने केलं होतं, ज्यांनी पुण्याच्या नाट्यप्रेमींसाठी हा अनोखा अनुभव साकारला.
म्हणतात ना, की जेव्हा कला आणि कलाकार एकत्र येतात, तेव्हा जादू घडते. ‘नाट्यसत्ताक रजनी’ ने यंदा ती जादू अनुभवली. नाट्यप्रेमींच्या नजरेत खरोखरच या रात्रभर चालणाऱ्या नाट्य महोत्सवाची उत्कंठा दिसत होती. चित्रपटांच्या रात्रीच्या शोज चं वेड असलेल्या तरुणांनी यंदा थिएटर चा रस्ता पकडला, आणि रात्रभर चालणाऱ्या नाटकांची मजा अनुभवली.
कार्यक्रमाची सुरुवात झाली एका खास नृत्य सादरीकरणाने, ज्याने एक अनोखा आशय मांडला – ‘डान्स फॉर पार्किन्सन्स’ प्रोग्राम अंतर्गत सादर झालेलं हे नृत्य म्हणजे एक जिवंत प्रेरणा होती. हळूहळू रात्र जागू लागली आणि रंगमंचावर आले ‘अफरा तफरी’ – गौरव बर्वे यांनी लिहिलेलं आणि ऋषी मनोहर यांनी दिग्दर्शित केलेलं एक हसतं-खेळतं नाटक, ज्यात ऑफिसचं गजबजलेलं वातावरण एका खास आशिर्वादामुळे हसण्याचा धबधबा बनलं. हास्याच्या फवाऱ्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आणि त्यांना खिळवून ठेवलं.


पहाटेच्या थंडगार वाऱ्यासोबत २६ जानेवारीचा उजाडता सूर्योदय, आणि त्याचसोबत ‘सोबतीचा करार’ हा मराठी गझलचा एक सुंदर कार्यक्रम. वैभव जोशी, आशिष मुजुमदार, आणि दत्तप्रसाद रानडे यांनी मराठी गझल आणि कवितांनी प्रेक्षकांना भावनांच्या समुद्रात बुडवून टाकलं. यानंतर, संदीप पाठक यांच्या ‘हसतील त्याचे दात दिसतील’ या स्टँडअप कॉमेडीने हास्याच्या लाटा आणल्या. आणि मग, तन्मय देवचक्के यांच्या ‘ तन्मय इन हार्मनी’ या संगीतमय कार्यक्रमाने रात्रीला एक सुमधुर स्वर दिला.
पण, जादू इथेच थांबली नाही. ‘गझल गराज मेहफिल’ या कार्यक्रमात, देवेंद्र भोमे, जयदीप वैद्य आणि नागेश अडगावकर यांनी उर्दू साहित्याची मोहिनी पसरवली, आणि प्रेक्षकांना एका सुंदर भावविश्वात नेलं. रात्रीचा निरोप घेण्यासाठी, तारे चमकताना, २६ जानेवारीच्या पहाटे, एकत्रितपणे राष्ट्रगीत गाताना, प्रेक्षकांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसत होती.
अमृत नोनीच्या पुढाकाराने, ‘झपूर्झा – म्युझियम ऑफ आर्ट ॲण्ड कल्चर’ यांच्या सहयोगाने आणि ‘गार्गी बाय पी. एन. गाडगीळ ॲण्ड सन्स’, ‘जाई काजळ’, ‘गंगोत्री होम्स ॲण्ड हॉलिडेज’, ‘फिनोलेक्स पाईप्स’, ‘मुकुल माधव फाउंडेशन’, ‘डॉन स्टुडिओज’, ‘बिग एफएम’ आणि ‘स्मृतिगंध’ यांच्या सहयोगाने हा महोत्सव अविस्मरणीय ठरला.


नाट्यसत्ताक रजनी २०२४ – एक अशा रात्रीची गोष्ट जी कधीच संपणार नाही. हा होता पुण्यातील थियेटरचा एक खास गुलदस्ता, ज्यात प्रत्येक कळीने आपला सुगंध फुलवला. रंगमंचावर घडलेली ही जादू, प्रत्येक हृदयात आणि मनात कायमस्वरूपी ठसे उमटवून गेली.


~ अदिती भाले

Wide Wings Media is an organization working in the field of Arts & Theatre production, Events and Talent management, Branding & PR and Digital Marketing. We are a passionate group of dynamic enthusiasts combining creativity using our best of the skills to stimulate you & our experience to guide you effectively from concept to delivery, thus recreating fresh ideas.